Saturday, February 27, 2010

सामान्य माणसाचं बजेट

प्रणव बाबुंनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडला. शनिवारचे सगळे पेपर्स त्यासंबंधी बातम्यांनी ओसंडुन वाहणार. विश्लेषक म्हणवुन घेणार्या लोकांनी तर टीव्ही आणि इंटरनेटवर मतं प्रदर्शित केलेली आहेतच. सत्ताधारी पक्षाचे लोक चांगला अर्थसंकल्प म्हणुन कौतुक करत आहेत तर विरोधक निषेध. विशेष काही नाही. या वस्तु स्वस्त झाल्या आणि या महाग झाल्या एवढं सगळीकडेच छापुन येईल पण पुढील वर्षात सामान्य माणसाने कसं जगायचं याविषयी कोणी काही सल्ला देणार आहे का? येत्या आर्थिक वर्षात खर्च जास्त करणं श्रेयस्कर असेल का बचत? प्रणव मुखर्जींनी नक्की काय केलं आहे आणि आपलं पुढच्या वर्षाचं नियोजन कसं असावं हे आपल्याला कळालं तर अर्थसंकल्प कळाला नाहीतर नेमेची येतो पावसाळा. चला मग आपणही प्रयत्न करुन बघुया. सामान्य माणसासाठी अर्थसंकल्प, साध्या सोप्या भाषेत.

पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की या बजेटकडे तुकड्या तुकड्यात न बघता एकत्र बघा. २० हजार कोटींचा महसुल अर्थमंत्र्यांनी वाढवला आहे. हे विधान सुचक आहे कारण एकाच वेळी इन्कम टॆक्स मधे सवलत आणि तरीही महसुल वाढवणं शक्य नसतं. महसुल गोळा करण्यासाठी दोन प्रकारच्या कररचनांचा अवलंब करता येतो. इन्कम टॆक्स सारखे प्रत्यक्ष कर वाढवणे आणि बेसिक वस्तुंच्या किमती कमी ठेवणे ही पहिली पद्धत आणि सेल्स टॆक्स, एक्साईज ड्युटी सारखे अप्रत्यक्ष कर वाढवुन इन्कम टॆक्स मधे सवलत देणे ही दुसरी पद्धत. पहिल्या कररचनेमधे मध्यमवर्गीय लोक आणि उद्योग नाराज होतात कारण इन्कम टॆक्स वाढतो, म्हणुन वस्तुंची मागणी कमी होते पण बेसिक गोष्टींच्या किमती गरीबांच्या आवाक्यात राहतात. गरीबांकडे देखील थोडा पैसा शिल्लक राहतो. दुसर्या कररचेनेमधे प्रत्येक वस्तु महागते तरीही मागणी कमी होत नाही कारण इन्कम टॆक्स कमी झाल्याने लोक खुश असतात. किमती चढ्याच असल्यामुळे त्या गरीबांच्या आवाक्यात राहत नाहीत. कमी उत्पन्न असलेल्यांचा मोठा भाग बेसिक गोष्टींवर खर्च होतो आणि गरीब वर्ग नाराज होतो. मला वाटतं की दोन्ही कररचनांमधे फक्त मानसिक सुख कोणत्या वर्गाला द्यायचं एवढाच फरक आहे. या वर्षी प्रणव मुखर्जींनी अप्रत्यक्ष कर वाढवले आहेत आणि इन्कम टॆक्समधे जास्त सवलत दिली आहे. एका हाताने दिलंय आणि दुसर्या हाताने जास्ती काढुन घेतलं आहे. महागाईने पोळुन निघणार्या मध्यमवर्गीयांना फक्त "मस्का" मारला आहे. अप्रत्यक्ष कर वाढवल्याने सगळ्या वस्तु आणि सेवा महाग होणार आहेत पण हे सरकार अधिक चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी महागाईचे चटके सोसायला तयार आहे. आता हे चांगलं का वाईट हे येणारा काळच ठरवेल पण या सगळ्या बनवाबनवीच्या धंद्याचा अर्थसंकल्प चांगला आहे हे नक्की. गुड जॊब प्रणवदा.

माझ्या मते येत्या आर्थिक वर्षात कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या लोकांनी खर्च आखडते घ्यावेत. या वर्षी चैनीच्या वस्तुंची खरेदी श्रीमंत लोकांच्या खांद्यावर जास्त टाकायला हरकत नाही असं सरकारचं मत आहे असं दिसतंय. बजेटमधे हेच दिसतंय. कार, टीव्ही, सिगारेट, विमान प्रवास, पेट्रोल इत्यादि महाग झालं आहे आणि इन्कम टॆक्स कमी झाला आहे. अधिक कालावधीसाठी इंफ्रास्ट्रक्चर बॊंडमधे पैसे गुंतवणार असाल तर बचत मर्यादा २०,००० ने अजुन वाढणार आणि ते सुद्धा ८०-सी मधे. शेतकर्याला कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, यासाठी व्याजदर २% ने कमी झाले आहेत. त्याचवेळी फर्टिलायजर सबसिडी कमी केल्याने शेतकर्याला नुकसान आहे. थोडक्यात काय तर शेतकर्याने कर्ज घेऊन महागडी शेती करावी असं सरकारला वाटतंय. घरांचे भाव डायरेक्ट कमी करण्याऐवजी सरकार बिल्डरांना विशेष करसवलती देणार आहे. याचा मध्यमवर्गीयांना काहीही फायदा होणार नाही, बिल्डरला फुकट अजुन पैसे मिळणार. फक्त जागांचे भाव वाढणार नाहीत एवढाच दिलासा. सध्याचे भाव परवडत असतील घर घ्यायला हरकत नाही. सोनं आणि चांदी अजुन महाग होणार आहे. संरक्षणावर खर्च वाढवलेला नाही. असे सगळे डिटेल्स आजच्या पेपरमधे आले असतीलच. मला तरी एवढंच दिसतंय की अर्थसंकल्पामधुन राजकारण बाहेर पडतंय जे व्हायला नकोय. कॊंग्रेसी अर्थसंकल्प आहे हा. भारताच्या विकासाचा मुद्दा कमी आणि वोट बॆंकेकडे लक्ष देणारा,गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प मांडण्यात प्रणव यशस्वी ठरले आहेत. मग आपण काय करायचं? तर आपल्या मिळकतीनुसार वागायचं. ३ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर खर्च अतिशय कमी करा, मागील वर्षापेक्षा देखील कमी. ३ लाख ते ५ लाख उत्पन्न असलेल्या लोकांसाठी कमी झालेला इन्कम टॆक्स आणि वाढणारे भाव यामधील फरका साधारण सारखाच असेल तेव्हा मागच्या वर्षीएवढेच खर्च करता येतील पण नवीन काही खर्च काढु नयेत. ५ लाख ते ८.५ लाख उत्पन्न गटासाठी इन्कम टॆक्स आणि वाढीव भाव यातील फरक बराच असेल आणि या उत्पन्न गटाकडुन मागणी कायम राहण्याची अथवा वाढण्याची अपेक्षा असेल म्हणुन जेवढा पैसा वाचतोय त्याच्या ४०% रक्कम खर्च करायला हरकत नाही. बाकीच्या ६०% पैकी काही भाववाढीमधे खर्च होईल आणि काही गुंतवणुक करा. १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेला गट भाववाढीसाठी फारसा चिंतीत नसतो तेव्हा तुम्ही थोडा जास्ती खर्च केला तरी चालेल. तुमचे उत्पन्न कोणत्या गटामधे आहे आणि नवीन कररचनेमधे तुम्ही किती टक्के इन्कम टॆक्स वाचवणार आहात त्याचा ग्राफ खाली दिलेला आहे.

Gross Total income

3,00,000

5,00,000

6,30,000

8,50,000

10,00,000

11,30,000

13,00,000

15,00,000

20,00,000

Pre Budget Income Tax

1,030

28,840

55,620

1,23,600

1,69,950

2,10,120

2,62,650

3,24,450

4,78,950

Post Budget Income Tax

0

19,570

32,960

76,220

1,12,270

1,52,440

2,04,970

2,66,770

4,21,270

Difference

1,030

9,270

22,660

47,380

57,680

57,680

57,680

57,680

57,680

Saving percentage

100.00

32.14

40.74

38.33

33.94

27.45

21.96

17.78

12.04


तुम्हाला बजेटविषयी आणि आमच्या फुकटच्या सल्ल्यांविषयी तुम्हाला काय वाटतंय हे अवश्य कळवा.

२७-फेब्रुवारी-२०१०

3 comments:

Swapnil P. Bendekar March 1, 2010 at 9:22 PM  

अप्रतिम विश्लेषण ,
धन्यवाद

kapil March 4, 2010 at 10:29 PM  

अति उत्तम. फारच छान. I must say, I feel inspired to learn more and more after reading your blogs. Pls keep writing.

Saurabh Panchi March 5, 2010 at 4:11 AM  

Thanks Swapnil & Kapil,
I am very happy that you liked this post.