Thursday, January 28, 2010

अर्थकारण आणि आपण

नमस्कार,
मी कोणी Investment Analyst नाहीये पण १२ जानेवारीला पहिला लेख लिहुन अशी भविष्यवाणी केली होती की मार्केट्स पडतील आणि अवघ्या १५ दिवसातच ते खरं झालं. आणि म्हणुन मला आता दुसरा लेख लिहिण्याची ईच्छा होतेय.

मार्केट्स थोडेसे पडले, पण पुढे काय? अजुन पडतील का? का वाढण्याची शक्यता आहे? हे सगळे अतिशय normal प्रश्न आहेत. जेव्हा जेव्हा मार्केट्स पडतात तेव्हा आता पुढे काय होणार याचीच उत्सुकता आणि थोडी भीती सगळ्यांना असते. तेव्हा कोणीही आपल्याला सल्ले देतात आणि आपण भाबडेपणाने ते मानतो. का? कारण generally लोकांना हे कळत नाही की ते जे शेअर्स विकत घेतात किंवा ते विकतात तेव्हा ते असं का करतायत? कोणीतरी सांगतोय आणि कदाचित त्या व्यक्तीला जास्त कळत असेल असं समजुन आपण घाम गाळुन कमावलेला पैसा कसाही उधळतो. एरवी १० रुपयाची कोथिंबीर विकत घेताना विचार करणारा सामान्य माणुस पैसा कुठे गुंतवावा याविषयी का उदासीन असतो हे कळत नाही. असो. विषयांतर होतंय. मी या लेखामधे कारणांसहित सांगेन की पुढील काही दिवसात तुमच्या गुंतवणुक कशा असाव्यात. त्या सोबत मागच्या १-२ लेखांमधे जे सगळ्या Asset Claases चा एकमेकांमधला संबंध सांगितला होता तो आपण अजुन थोडा जास्ती analyse करुन बघु. यामुळे आपला रोजच्या जगण्यातला पैशाचा ताळमेळ वाढेल. मी सगळं काही कारण आणि उदाहरणांसहित सांगेन, एकदम logical analysis. पटलं आणि अमलात आणता आलं तर बघा नाहीतर ऐकीव सल्ल्यांवर पैसा फेकता येतोच आपल्याला, नाही का !

सर्वप्रथम सध्या जगात काय चालु आहे हे जाणुन घेणं महत्वाचं आहे.
ग्रीस आणि पोर्तुगाल या तुलनेने लहान असलेल्या युरोपीयन देशांची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. म्हणुन हे देश युरोपमधील इतर देशांच्या मदतीकडे डोळे लावुन बसले आहेत. जर्मनी आणि फ्रांसने सांगितलं, मदत करणार नाही. त्यांचीच अर्थव्यवस्था आता कुठे सुधारते आहे, ते कुठे मदत करत बसणार. चीन या दोन देशांची मदत करायला तयार आहे. पण त्यामुळे चीनचा युरोपीयन बाजारपेठेत शिरकाव होईल आणि चीनचं युरोपमधील वजन वाढेल. हे कोणत्याही युरोपीयन देशाला मान्य असणं शक्य नाही म्हणुन ग्रीस आणि पोर्तुगालने देखील चीनी मदत नाकारली आहे. पुढचा सामान्य प्रश्न म्हणजे ही मदत करतात कशी? ज्या देशाला मदत हवी आहे त्या देशाचे "Government Bonds" विकले जातात आणि मदत करणारा देश तो विकत घेतो. म्हणजे कर्जरोखे. या मदतीबद्दल व्याज आकारले जाते. व्याजाचं काय आहे हो, फेडता येईल पण यामुळे चीनपुढे युरोपचं काही चालणार नाही ना, मिंधेपणा येईल आणि नेमकं म्हणुनच त्यांना ही मदत नकोय. पण आता काय होईल? युरोपमधे सर्वत्र एकच चलन आहे, ते म्हणजे युरो. म्हणजेच युरोची ताकद ही युरोपमधील सर्व देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थेवर अवलंबुन आहे. म्हणजे ग्रीस आणि पोर्तुगालच्या नाकर्तेपणाचा फटका जर्मनी आणि फ्रांसला बसणार आणि युरोचा भाव घसरणार. हे घडु नये म्हणुन त्यांना या दोन देशांना मदत करावीच लागेल. हे म्हणजे "घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं" असं झालंय. जर्मनीमधे कर भरणार्या नागरिंकाचा पैसा चालला ग्रीसमधे. कारण चलन एकच आहे आणि globalisation म्हणजे हे सगळं आलच. आपलं सरकार नाही का, बांगलादेश आणि म्यानमारला मदत करतं किंवा श्रीलंकेमधे सैन्य पाठवुन मदत पोचवतं. ते का? कारण त्यांना आपल्या बाजुने ठेवलं तर आपल्याला ते मदत करतील नाहीतर चीनच्या बाजुचे होतील आणि चीन तर टपुनच बसला आहे आपले एक-एक तुकडे गिळायला ! म्हणुन ईथे आपण कर भरतो आणि तिकडे म्यानमारच्या गरीब लोकांना जेवायला मिळतं. पण हे असंच असतं, त्याला काही इलाज नाही. ग्रीसमधील समस्येचा सुगावा सगळ्यात आधी euro - dollar currency traders ना लागला. युरो कमकुवत होणार या भीतीने युरोची विक्री सुरु झाली आहे आणि डॊलरची खरेदी. म्हणुन डॊलरने मागील ६ महिन्यांमधील उच्चांक गाठला.

दुसरं असं की भारत आणि चीन या दोन देशांची अर्थव्यवस्था बरीच वेगाने वाढते आहे. हा वेग कायम नियंत्रणात ठेवावा लागतो. नाहीतर Inflation वाढण्याचा धोका असतो. जे आपण सध्या अनुभवतो आहोत. साखर, डाळ, तांदुळ, गहु, दुध सगळ्या गोष्टींचे भाव आसमानाला भिडले आहेत. सध्या भारतातील Food Inflation हे २०% आहे. म्हणुन रिजर्व बॆंकेला असं वाटतंय की आता देशातील उपलब्ध असलेल्या पैशाला लगाम घातला पाहिजे. म्हणुन CRR rates वाढतील असं भाकित केलं जातंय. CRR rates is Cash Reserve Ratio rates. प्रत्येक बॆंकेला त्यांच्या एकुण उत्पन्नाच्या काही टक्के भाग रिजर्व बॆंकेमधे ठेवावा लागतो. या ठेवी कमी जास्ती करुन देशात उपलब्ध असलेल्या पैशावर नियंत्रण मिळवलं जातं. Economy overheating होऊ नये यासाठी या उपाययोजना असतात. आता अर्थव्यवस्था सुरळीत झाल्यामुळे सरकार स्टिम्युलस पॆकेज काढुन घेणार हे उघड आहे. आणि त्यानंतर व्याजदरांमधे प्रत्यक्ष वाढ केली जाण्याची शक्यता आहे. आणि मध्यम वर्गासाठी वाईट बातमी म्हणजे इन्कम टॆक्स वाढवला जाईल. मागच्या वर्षात १,६०,००० कोटीचं स्टिम्युलस पॆकेज जाहीर झालं होतं त्याचा खर्च आपल्या खिशातुन काढला जाणार. या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने केल्या जातील. बाजारातला पैसा कमी झाल्यामुळे शेअर मार्केट्स पडणार हे निश्चित. मी अजुनही म्हणतोय की मार्केट १४,००० पर्य़ंत खाली जाईल. कदाचित १२,५००. बजेटच्या आसपास आपले शेअर मार्केट्स सगळ्यात खालच्या स्तरांवरती असतील, आणि तीच गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ आहे. जी परिस्थिती भारतात आहे जवळपास तशीच परिस्थिती चीन मधे आहे. तिथे देखील लाल शिकंजा आवळु लागला आहे. या सगळयाचा सरळ परिणाम अमेरिकन आणि युरोपीयन गुंतवणुकदारांवरती होतो. भारत आणि चीन मधे वाढीव व्याजदर, बाजारातला कमी पैसा आणि वाढणारे टॆक्स या कारणांमुळे सध्या परदेशी गुंतवणुकदारांनी भारत आणि चीन मधुन पैसा काढुन घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणुन मागचा १ आठवडा मार्केट्स पडत आहेत. Investment Banks च्या म्हणण्यानुसार आगामी काही महिन्यात भारत आणि चीनमधुन खुप पैसा मिळण्याची अपेक्षा गुंतवणुकदारांनी ठेऊ नये. या कारणाने देखील पुढील काही महिन्यात परदेशी गुंतवणुकीचा ओघ आटेल असं वाटतंय. आपले मार्केट्स हे Foreign Investors मुळे वर खाली जातात म्हणुन आपणदेखील फार अपेक्षा ठेऊ नये हेच खरं.

आता परत जाऊया डॊलर कडे. जेव्हा जेव्हा जगातील इतर बाजारांमधे अस्थिरता असते तेव्हा गुंतवणुकदार अमेरिकन ट्रेजरीमधे पैसे गुंतवणं सुरक्षित समजतात. It's a safe heaven, which is fully supported by USA government credit and faith. या ट्रेजरी बिल्समधे गुंतवणुकीवर रिटर्न्स फार मिळत नाहीत पण कमीत कमी Inflation पासुन सुरक्षा मिळते. सध्या आपण ही फेज अनुभवतो आहोत. सगळ्या बाजारांमधुन पैसा काढला जातोय आणि अमेरिकेमधे गुंतवणुक वाढते आहे. ही अमेरिकन ट्रेजरी बिल्स फक्त डॊलरमधे खरेदी करता येतात. या कारणामुळे देखील डॊलरची खरेदी वाढते आहे आणि डॊलर मजबुत होतोय. डॊलर, युरो, जपानचा येन आणि चीनचा युआन यासारखी मजबुत चलनं आणि सोन्याचा भाव यामधे देखील सरळ संबंध आहे. असं म्हणता येईल की सोन्याचा भाव फॊरेन एक्स्चेंज मार्केट्स मधे ठरतो. पण त्यासाठी त्या देशाच्या चलनामधे तेवढी ताकद हवी म्हणुन या चार देशांचा उल्लेख केला. भारतीय रुपयाला मजबुत होण्यासाठी अजुन बराच वेळ लागेल. चीनने मागच्या आठवड्यात त्यांच्या देशातील सोन्याचे उत्पादन ११% अधिक वाढल्याचे जाहीर केले आहे, म्हणुन सोन्याचा पुरवठा वाढेल. आणि वर सांगितलेल्या दोन कारणांमुळे डॊलरचा भाव वाढतोय. डॊलर आणि सोनं यामधे व्यस्त गुणोत्तर असतं, म्हणजे डॊलर वाढला की सोन्याचा भाव कमी होतो जे आपण येत्या काही दिवसात अनुभवु. सोन्याचा भाव 1 औंस = १०८७ डॊलर एवढा चालु आहे. १ औंस म्हणजे २८.३५ ग्रॆम. माझ्या मते मागील काही वर्षात सोन्याचा भाव अवाजवी वाढला आहे जो बुडबुडा आता फुटेल. याला Asset Bubble असं म्हटलं जातं. जसं मागील वर्षी शेअर मार्केट्स आणि रिअल इस्टेट मार्केट पडले तसंच सोन्याचं देखील होईल. जगविख्यात सट्टेबाज जॊर्ज सोरोस ने भविष्य वर्तवले आहे की सोन्याचा भाव पडेल. सोरोसच्या प्रत्येक वाक्याला आर्थिक जगात किंमत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर मंदी आवरण्यासाठीच्या उपाययोजना जास्ती कडक रीतीने अमलात आल्या तर मंदी संपण्याआधीच बाजारतील पैशाचा पुरवठा कमी होऊन जग पुन्हा एकदा मंदीच्या गर्तेत जाईल. ते म्हणतात, जागतिक मंदीच्या बाहेर पडतानाच्या प्रोसेसेसचा अनुभव नसल्यामुळे अनेक देशांचे सरकार चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणतात की जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा asset bubbles तयार होतात आणि जे आता सोन्यामधे झाले आहेत. संकटाची चाहुल लागली तर सोन्यामधील गुंतवणुकदार, ज्यांनी बराच नफा कमावला आहे ते विक्री सुरू करतील आणि भाव पडतील. पण जर यदाकदाचित सगळ काही आलबेल राहिलं तर मात्र सोन्याचा भाव लगेच कमी होणार नाही पण तरीही तो भविष्यात बराच कमी होण्याची शक्यता आहे. म्हणुन सध्या सोनं खरेदी करू नका. डॊलरच्या भावाकडे लक्ष ठेवा आणि सोन्याचा भाव जर घसरत गेला तर १५,५०० च्या आसपास खरेदी सुरू करायला हरकत नाही. पण जपुन. कोणतीही खरेदी करताना एकुण रकमेच्या २०% पेक्षा जास्त कधीही करू नये हे लक्षात असु द्या. २-३ वेळा भाव बघुन खरेदी करा आणि मग Average cost काय आहे ती बघा. भारतातील रिअल इस्टेटचे भाव लगेच कमी होण्याची शक्यता कमी. पण शेअर मार्केट्स पडले की बिल्डरचा confidence देखील कमी होतो. ती वेळ खरेदीसाठी उत्तम. आता commodities चे भाव स्थिर असतील आणि शेअर मार्केट्स पडतील. मार्च - एप्रिलमधे व्याजदरांमधे वाढ झाल्यावर Fixed Deposit करायला हरकत नाही. दुसरा कोणताही asset class फार चांगले रिटर्न्स देईल असं वाटत नाही. माझ्या software मधल्या मित्रांनो, onsite ला जाऊन आला असाल आणि काही डॊलर्स खिशात असतील तर ४६.५ च्या पुढे टप्प्याटप्प्याने convert करायला हरकत नाही. युरोपमधल्या मित्रांना त्यांचे युरो convert करण्यासाठी थोडी कळ काढावी लागेल. काही महिने वाट बघा, पैशाची लगेच निकड नसेल तर.

आपण एक टेबल बनवुया, त्यामधे कधी काय करायचं आहे ते मांडु या. सोपं पडेल.


जाता जाता, मराठी मित्रांनो, CNBC बघणं सुरु केलं का? Invest करा. पैसा वाया जाऊ देऊ नका. लक्षात असु दे, आता रिस्क न घेणार्याची जगात काही किंमत नाही.
जय महाराष्ट्र.

सौरभ पंची
२९-जानेवारी-२०१०

8 comments:

एम. डी. रामटेके January 28, 2010 at 8:34 PM  

आपल्याला तर आजही बचतीची फारशी सवय नाहिये.
बघु पुढे काय होतं ते!!!!!!!!!!!१

Anonymous January 28, 2010 at 9:01 PM  

Again, balanced view with facts and good analysis.
In your first article, I have mentioned that you have done very good analysis.
And now it is proved you are right.
I really thank you for increasing our knowledge in economics.
Everyone should need this basic understanding in today’s global world.

Thanks
Sachin Kaulgekar

विशाल तेलंग्रे January 28, 2010 at 10:25 PM  

खुप अभ्यासपूर्ण लेख आहे, खुप माहिती मिळाली... आभार आणि कीप इट अप....!

- विशल्या!

Saurabh Panchi January 29, 2010 at 3:37 AM  

रामटेकेजी, बचतीची सवय लावुन घ्यायला काय हरकत आहे?

सचिन, thanks again for appreciation

विशाल, बर वाटलं तुम्हाला लेख आवडला म्हणुन

-सौरभ

Samved January 29, 2010 at 6:39 AM  

Good re....I am happy that my little bros started thinking in so many varied directions....good one

Saurabh Panchi January 29, 2010 at 6:45 AM  

Thanks Samved dada :)

Kapil Deo January 29, 2010 at 9:30 PM  

वा गुरुजी, मानल!! झकास लेख लिहिलाय. आत्ताच माहिती नाही पण भावी investment analyst तर नक्कीच आहात तुम्ही. माहितीपूर्ण गोष्टींना सहज सांगण्याच्या हातोटीच विशेष कौतुक करावस वाटत. भावी लिखाणासाठी खूप खूप श्चुभेछा !!

Saurabh Panchi January 30, 2010 at 5:50 AM  

धन्यवाद चेले :)