Thursday, December 31, 2009

राज ठाकरेंना पत्र

श्री.मा.राज ठाकरे,
नमस्कार.

सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. कारण तुम्ही मराठीचा मुद्दा ऊचलुन धरल्यानंतर माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांना मुंबईमधे जगण्याचा धीर आला आणि कोणीतरी आपल्यासाठी झटतोय हे बघुन आनंद वाटला.

राजकीय पक्ष असल्याकारणाने तुम्ही जे काही विधायक कार्य करताय त्यामागे फक्त तुमचे राजकीय उद्देश आहेत आणि इतर सर्व पक्षांसारखेच आपणही असाल असे आरोप होणं स्वाभविक आहे. आणि या प्रकारचे आरोप होतील याची तुम्हाला पुर्ण कल्पना असेलच याची मला खात्री आहे. पत्रास कारण असे की मध्यंतरी इंटरनेट वर बर्याच ठिकाणी असं वाचण्यात आलं की मुंबई मधील रेडिओ चॅनल्स वर सगळे आर-जे हिंदी बोलतात आणि मराठीची जाहीररित्या टिंगल केली जाते. हे ऐकल्या नंतर मी लक्षपुर्वक सगळे चॅनल्स ऐकायला लागलो आणि दुर्दैवाने हे सगळं खरं आहे हे निदर्शनास आलं. चेन्नईमधे सगळे रेडिओ जॉकी तामिळ भाषेत बोलतात आणि आंध्र मधे तेलगु. कॉस्मोपॉलिटन समजल्या जाणार्या बेंगलोर मधेसुद्धा कन्न्ड मधे संवाद साधला जातो. ईथे संवादाचं तर राहुच द्या पण मागच्या ३-४ वर्षांमधे कधीही मराठी गाणं कोणत्याही रेडिओ चॅनलवर ऐकलेलं मला आठवत नाहीये. आणि कोणत्याही मराठी माणसाला रेडिओ जॉकी म्हणुन नोकरी दिली जात नाही. कारण त्यांच म्हणे हिंदी चांगलं नसतं? आणि शेवटी एक मराठी जॉकी महाराष्ट्राची टिंगल करणार नाहीच ना! तुम्ही स्वतःदेखील रेडिओ ऐकत असाल् तुम्हीच आठवुन बघा, या आधी मराठी गाणं कधी ऐकलं होतं?

यासोबतच हे देखील इंटरनेटवर वाचनात आलं की काही जणांनी मनसे आणि शिवसेना या मराठीचा झेंडा खांद्यावर घेणार्या दोन्ही पक्षांशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न व्यर्थ ठरले. म्हणुन हे सगळे जण फक्त स्वार्थाचे "राज"कारण करत आहेत ही भावना वाढीस लागु शकते. मला आजही तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही जे बोलाल ते करुन दाखवाल आणि हे सामर्थ्य तुमच्यामधेच आहे हे आम्ही सामान्य लोक जाणतो. माझ्यासारखे हजारो लोक तुम्हाला रोज काही ना काही अडचणी सांगत असतील आणि सर्वांनाच वेळ देणं शक्य नाहीये हे मला माहिती आहे पण तरिही तुम्ही या पत्राची योग्य ती दखल घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि समजा आमच्या दुर्दैवाने लोक बोलतात तसा राजकारण हा जर फक्त वैयक्तिक स्वार्थ असेल तरीही आम्हाला काहीही वाटणार नाही. राजकीय नेत्यांकडुन होणारा अपेक्षाभंग सामान्य माणसासाठी नवीन कुठे आहे !

धन्यवाद्.
सौरभ पंची
३१/१२/२००९

(हे पत्र मी राज ठाकरेंना उद्देशुन मनसेच्या वेबसाईट वर लिहिले आहे.)

2 comments:

निल्या January 1, 2010 at 3:13 PM  

ह्याच विषयावर मी संजय राउतांना पत्र धाडले होते. काही उत्तर आले नाही. शिवसेना किंवा मनसे दोघेही या गोष्टीत लक्ष घालायला तयार नाहीत. यासाठी आपणच जबाबदार आहोत, इतके वर्ष आपण सारे झोपलो होतो.

Saurabh Panchi January 1, 2010 at 7:44 PM  

अरे खरं तर हा विषयसुद्धा मनात आला नाही रे. किती वेळा आपण रेडिओ ऐकतो पण खरंच जाणवलं नाही. कन्फेशन...