Tuesday, December 22, 2009

घर पाहावं बांधुन....

मराठीमधे ही म्हण एकदम अवघड अशा काही गोष्टींसाठी वापरली जाते हे मला माहिती होतं पण ते अनुभवायला मिळालं जेव्हा मी स्वतः या गोष्टींमधे पडलो. या लेखाच्या शीर्षकावरुन विषय तर कळालाच आहे. मग आपण आता पुण्यामधे मध्यम वर्गीय माणसाने घर कसं शोधावं याच्यावर चर्चा करु. जसं मी आधी म्हणालोच आहे की हा ब्लॊग सामान्य लोकांसाठी आहे, मॆंगो पीपल :)

आता कोणी म्हणेल की पुण्यातच का? कारण सोपं आहे, माझा रिसर्च तेवढाच आहे म्हणुन. खरं म्हणजे मला या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये पण नाईलाज आहे. का बोलायचं नाहीये? कारण मराठी मध्यमवर्गीय माणसाने कितीही हात-पाय मारले तरी त्याचं फ्लॆट चं बजेट काय असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि मला नेमका याच गोष्टीविषय़ी राग आहे. आपलं बजेट का कमी असतं? कारण सगळा मराठी वर्ग हा नोकरदार असतो. पगारात भागवणारा. मग काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असणार ना ! आपण एखाद्या कोटीचा बंगला सहज घेऊ या असं स्वप्नं सुद्धा बघु शकत नाही. का? कारण ते नोकरी करुन शक्य होत नाही. मग मराठी माणुस धंदा का नाही करत? काय पडलंय नोकरीमधे? आपण कधी मोठे होणार रे बाबांनो? म्हणजे दहावी बारावी पास नापास असा गुजराती मारवाडी बिल्डर कोट्यधीश असतो आणि त्याच्या बिल्डींग मधे २० वर्षांसाठी कर्ज काढुन एक टुकार फ्लॆट घेणार्या उच्च विद्याविभुषीत मराठी माणसाला कर्जाचे हप्ते कसे फेडायचे याची चिंता असते. आता हा बदल काही एकदम होणार नाहीये, जवळपास आपल्या सर्वांचे वडील नोकरी करतात आणि आपण सुद्धा तेच करतो. पण आपल्या मुलांनी तरी व्यवसाय केले पाहिजेत आणि याची बांधणी आपल्या सर्वांना करायची आहे. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रत्येक कमजोर बाजु छाटुन टाकायची आहे. असो, तर किमान आज तरी आपण आपल्या मध्यम वर्गीय स्वप्नांवर चर्चा करु, आणि सोनेरी दिवस लवकरच उजाडेल यासाठी एकजुटीने प्रयत्न करु.

पुण्यात रिअल इस्टेट मधे तेजी आली, सॊफ्टवेअर मधे काम करणार्या तरूण मुलांच्या डोळ्यांमधे फ्लॆट ची स्वप्न दिसायला लागली आणि घरोघरी या चर्चा रंगायला लागल्या. अशाच एका दिवशी माझ्या घरी आईने बॊम्ब टाकला. तिने जाहीर केलं की आपण फ्लॆट घेणार आहोत. मी जागेवरून उडालोच. मला वाटलं की आपल्याला लॊटरी लागली आहे का! म्हणुन मी तिला विचारलं की हे कधी ठरलं? आईने भारी उत्तर दिलं. ती म्हणे, आजचा पेपर बघ. फक्त २५ लाख रुपयांमधे कोथरूड मधे बंगला मिळतोय. अर्थातच अशा भुलवणार्या जाहिरातींकडे दुर्लक्ष करावं, आणि तसं मी ते केलं पण मनात शंका आलीच की बहुतेक आता आईच्या डोक्यात फ्लॆट घेण्याविषयी जोरदार विचार सुरु आहेत. म्हणुन मी आधीच सांगुन मोकळा झालो, "पैसे नाहीत." उत्तर मिळालं, "तुला कोण मागतंय?".
मी: तुझ्याकडे आहेत?
आई: नाही.
मी: मग कुठुन आणणार?
आई: होईल काहीतरी व्यवस्था.
मी: २५-३० लाखांची?
मी: बाबा, काय चालंलय? काय म्हणतेय आई?
बाबा: काही नाही. तिला वेड लागलंय.
मी: हुश्श....मग ठीक आहे.

असे "संवाद" आमच्या कडे झाले, बहुतेक सगळ्यांकडेच होत असतील, पण आईला वेड लागलं नव्हतं. तिने चक्क घरं शोधायला सुरु केली आणि मी कधी त्यात ओढला गेलो मला कळलंच नाही. खिशात पैसा नव्हता आणि फार मोठं कर्ज घेण्याची ऐपत नव्हती. तरीही साईट व्हिसिट्स, प्रॊपर्टी ए़क्जिबीशन्स ना भेटी देणं सुरु झालं. हळु ह्ळु या क्षेत्रामधल्या व्याख्या कळायला लागल्या. बरे वाईट अनुभव येत गेले आणि शेवटी, मंजिल मिल गयी !!

पण या सगळ्या गोष्टींसाठी मला १.५ वर्ष लागली आणि मार्गदर्शक कोणी नव्हता. म्हणुन हा ब्लॊग लिहितोय. अनेक जणांना याचा फायदा होईल. माझ्या मते, फ्लॆट घेण्याआधी आपण ३ गोष्टींचा विचार केला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं बजेट काय? नोकरी कोणत्या भागात करता आणि किती बेडरुमचा फ्लॆट शोधत आहात? आपण सर्वांना ३ श्रेणींमधे टाकुया. बजेट १७-१८ लाख, बजेट २६-२७ लाख आणि बजेट ३४-३५ लाख. यापेक्षा कमी किमतींमधे चांगले फ्लॆट मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मी या श्रेणी का निवडल्या कारण ज्यांना घर घ्यायचं आहे असा आपल्यापैकी प्रत्येक जण यापैकी एका श्रेणी मधे असतो, म्हणुन. तुमचं बजेट यापेक्षा अधिक असेल तर चांगली गोष्ट आहे. तरिही या ब्लॊग मधील माहिती तुमच्या उपयोगी पडु शकेल. आता आपण एकेका श्रेणीचा विचार करुया.

पुण्यात १७-१८ लाखांमधे फ्लॆट येतो? कुठे मिळतात हो असे फ्लॆट्स? विश्वास कदाचित बसत नसेल पण या पैशात घर विकत घेता येतं हे नक्की. फक्त अशा वेळेस फारशा अपेक्षा बाळगु नका. १७ लाखांमधे कार पार्कींग सहित घर मागाल तर बिल्डर पळवुन लावेल. पुण्यामधे सातारा रोड वर पद्मावती, के के मार्केट, धनकवडी, नाहीतर सिंहगड रोड वर धायरी, वडगाव बुद्रुक, एक्सप्रेस हायवे किंवा विश्रांतवाडी, किंवा कोंढवा, अप्पर इंदिरा नगर, बिबवे वाडी, कात्रज, सुखसागर नगर, नगर रोड वर वडगाव शेरी, चंदन नगर, आणि हडपसर, मुंढवा, सोलापुर रोड आणि पिंपरी चिंचवड, निगडी प्राधिकरण या भागांमधे १ बी-एच-के फ्लॆट १७-१८ लाखांमधे घेता येईल. पुण्यात घेत असाल तर कदाचित १०-१५ वर्ष जुनं घर घ्यावं लागेल, पिंपरी चिंचवड भागात नवीन बिल्डींग मधे एवढ्या पैशात घर घेता येऊ शकेल.

आता आपण जाऊ या पुढच्या श्रेणी मधे, २६-२७ लाख. पण आता मी पुढील दोन्ही श्रेणींचा एकदम विचार करणार आहे. म्हणजे २६ लाखांपासुन ३५ लाखांपर्यंत. आता तुम्ही म्हणाल की असं का? कारण जेव्हा मंदी असते तेव्हा २७ लाखांना मिळणारा फ्लॆट तेजी मधे कधी ३४ पर्यंत पोचतो हे कळत सुद्धा नाही. काहीही बदललेलं नसतं, फक्त बिल्डरची भुक जागी झालेली असते, बस्स. या बजेट मधे बर्यापैकी चांगली घरं मिळतात, पण तुम्हाला ती नीट शोधावी लागतात. अशी घरं कशी शोधावीत आणि पुण्यातल्या कोणत्या भागात हे मी सांगु शकतो. वर जे काही पुण्यातले भाग सांगितले आहेत तिथेच पण या बजेट मधे तुम्हाला २ बीएचके घेता येऊ शकेल. म्हणजे पुण्यामधे सिंहगड रोड, कात्रज, वारजे, धायरी, चंदन नगर, हडपसर, विश्रांतवाडी, विमान नगर, मगरपटटा, बाणेर, पाषाण, सुस रोड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत पिंपळे सौदागर, काळेवाडी फाटा, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पिंपरी, निगडी या भागांमधे घर घेता येईल.

पण तुम्ही ठरवणार कसे की तुम्हाला घर कुठे घ्यायचं आहे. शहाणपणाचा निर्णय हा असतो की तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणापासुन जवळ असलेलं आणि तुमच्या बजेट मधे असलेला प्रत्येक भाग चांगला असतो. त्यातल्या त्यात चांगलं "ऒप्शन" शोधण्याची जबाबदारी तुमची स्वत:ची कारण सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत. पण तुम्ही हे घर शोधणार कसं? तयारी कशी करणार? सर्वात आधी पुण्यातल्या प्रॊपर्टी एक्जिबिशन्स ना जायला सुरु करा. त्याने तुम्हाला अंदाज येईल की सध्या पुण्यात कोणते प्रोजेक्ट्स चालु आहेत आणि प्रति स्क्वेअर फुट भाव काय आहे, म्हणजे तुमचं घर साधारणपणे कोणत्या बजेट मधे बसेल. किंवा तुम्ही इंटरनेट वर घरं शोधु शकता. त्याने अंदाज येतो सध्या भाव काय चालु आहे. जे जे प्रोजेक्ट्स तुम्हाला चांगले आणि तुमच्या बजेट मधे आहेत असं वाटतंय त्यांचे ब्रोशर्स घरी आणा. सगळ्या फ्लॆट्स ची एकमेकांशी तुलना करा आणि तुमच्या लक्षात येईल की कोणता बिल्डर जास्ती महागडा आहे. कोणाचा फ्लॆट खरंच चांगला आहे, कोण जास्तीत जास्त फायदे देतोय, इत्यादि. तुलना करताना सर्वात आधी महत्व द्यावे ते फ्लॆटच्या "प्लॆन" ला. घराचा दरवाजा कुठे आहे? लिव्हिंग रुम चा आकार किती आहे. किचन कुठे आहे? ते कितपत मोठे आहे? डायनिंग आणि किचन एकत्र आहे का? नसेल तर लिव्हिंग रुम, किचन आणि डायनिंग यांचा एकत्रित प्लॆन कसा दिसतो? लिव्हिंग रुम मधुन सगळं घर आरपार तर दिसत नाहीये ना? साधारण पणे सगळ्या रुम्स ना आपापली "प्रायव्हसी" असावी. हो, किचन ला सुद्धा. घर घेताना लांबच लांब बोळ असलेलं घर शक्यतो टाळावं, कारण अशा घरामधे घराच्या लिव्हिंग रुम अथवा हॊल मधुन सगळ्या बेडरुम दिसतात आणि मग तुम्हाला सगळ्या घरात पडदे लावावे लागतील. हे टाळायचं असेल तर घर घेतानाच त्याच्या "प्लॆन" कडे लक्ष द्यावे. अजुनही बर्याच गोष्टी आहेत. घराला टेरेस आहे का? ती हॊल ला आहे का बेडरुम ला? आकार काय? कमीत कमी एखादी खुर्ची टाकुन बसण्याएवढी तरी जागा आहे का? एखादी कुंडी ठेवता येईल का? त्याची सोय आहे का?

आता आपण जाऊ बेडरुम मधे. म्हणजे फ्लॆट बघायला. कोणीही त्याचे "गैर" अर्थ काढु नयेत (सुंदर मुली अपवाद), हे हे हे !!
बेडरुम्स ची साईज किती आहे हा एक मोठा प्रश्न असतो. साधारण पणे मास्टर बेडरुम १३*१४ ची असावी आणि गेस्ट बेडरुम ११*१३ ची असते. अरेच्या, एक तर राहुनच गेलं. २ बीएचके च्या फ्लॆट चा साधारण पणे आकार १०५०-११०० स्क्वेअर फुट असतो. याला प्रमाण मानुन मी डोळ्यांसमोर एक आराखडा ठेवला होता, की "प्लॆन" कसा असावा? तो इथे देत आहे. कदाचित उपयोगी पडेल. लिव्हिंग रुम १६*१७, किचन ९*१०, डायनिंग ९*१०, मास्टर बेडरुम १३*१४, गेस्ट बेडरुम ११*१३, अटॆच्ड बाथरुम पण बेसिन बाहेर असाव. किचन ला अटॆच्ड ड्राय बाल्कनी, भांडे घासण्यासाठी. वॊशिंग मशीन ठेवण्यासाठी पुरेशी जागा, आणि मास्टर बेडरुम च्या अटॆच्ड बाथरुमचा एंट्रन्स हा आत मधुनच असावा. त्या साठी बेडरुम चा दरवाजा उघडावा लागु नये. माझ्या मते आता बेडरुम पुराण बस झालं, होय ना ;)

अजुनही लहान लहान अशा बर्याच गोष्टी असतात. किचन ओट्याचा साईज काय आहे? तो एल आकाराचा आहे का? मिक्सर, ओव्हन हे ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक प्लग्स आहेत का? किचन ऒट्यावरच्या टाईल्स पुर्ण वर पर्यंत आहेत का? त्यांचा रंग काय आहे? पांढरी टाईल्स असेल तर ती आपल्या स्वयपाक आणि धुरामुळे पिवळी पडते. मग बांधकाम चालु असताना हे तुम्हाला बदलुन घ्यावं लागतं. किचन मधे एक्जॊस्ट फॆन आहे का? नाहीतर धुर बाहेर कसा जाणार? काही ठिकाणी धुर शोषुन घेणारी चिमणी बसवलेली असते. आणि जर तुम्हाला "ऎक्वा गार्ड" लावायचं असेल तर ते कुठे लावाल? फ्रीज कुठे ठेवणार? किचन तेवढं मोठं तरी आहे का? डायनिंग टेबल वर किती लोक बसु शकतील? तो कुठे ठेवावा लागेल? बेसिन वर आरसा आहे का? घरामधे इन्वर्टर आहे का? सगळं घर त्या बॆक-अप वर आहे का एखादी रुम? घरामधे येताना एंट्रन्स लॊबी कशी आहे? प्रशस्त आहे क बिल्डर ने कंजुषी करुन पैसा मारला? हे सगळं सगळं मना सारखं जमलं पाहिजेच कारण आपण तिथे राहणार ना? मग तडजोड नको.

आता विचार करुया दिशांचा. हल्ली सगळेच बिल्डर वास्तुशास्त्रा प्रमाणे घरं बांधतात, तरीही जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर त्या गोष्टी विचारात घ्या. पुण्यामधे दक्षिणे कडुन पश्चिमे कडे वारा वाहतो. म्हणुन घराच्या खिडक्या अथवा टेरेस ची दिशा पश्चिम असावी असं माझं म्हणणं होतं. आणि घरा मधे वारा हवा असेल तर घर ३ अथवा ४ मजल्यावर असावं. हे मजले चढायला सोपे. हा विचार करावा लागतो कारण वीज जाते आणि लिफ्ट बंद पडते. कोणी म्हणेल बॆक-अप असतो ना लिफ्ट ला. मान्य आहे, काही दिवस असतो, बिल्डर मेंटेनन्स करत असतो तोपर्यंत तो त्याचे पैसे घेत असतो. बरं झालं, अजुन एक गोष्ट आठवली. सगळेच बिल्डर ऎमिनिटीज म्हणुन स्विमींग पुल, जिम्नशियम किंवा जॊगिंग असं काहीतरी बनवतात आणि त्याचा पैसा आपल्याडुन तो घेत असतो. एकदा का तो काळ संपला की सोसायटी ला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि कोणीही कसलंही काम करायला पुढे येत नाही. पुण्याचे लोक तर अजुनच अर्क असतात. पहिल्या मजल्याचे लोक आम्ही लिफ्ट वापरत नाहीत, आम्ही पैसे देणार नाही असं सांगुन मोकळे होतात. म्हणुन घर ३-४ मजल्यावर असावं. तुम्हाला लिफ्ट वापरायचं समाधान आणि सोयीस्कर पण आहे. कमीत कमी चालत ३-४ मजले चढता तरी येतात. आणि कसल्याही ऎमिनिटिस च्या मागे लागु नका. काहीही मेंटेन होत नाही. त्यापेक्षा कोणत्याही चांगल्या जिम मधे पैसे भरलेले परवडतात.

आता अत्यंत महत्वाच्या अशा काही टिप्स. तुम्हाला हा अनुभव कदाचित असेल की सगळं अगदी मनासारखं असतं पण बिल्डर सांगतो की सगळॆ फ्लॆट्स संपले. फक्त शेवटच्या मजल्यावर २ फ्लॆट्स आहेत आणि आपण निराश होऊन परततो, याचा विचार करत की पुण्यामधल्या सगळ्या लोकांनी या एका बिल्डिंग मधेच फ्लॆट घेतले का? एकही कसा शिल्लक नाही. खरं काय असतं माहिती आहे? जवळपास सगळे फ्लॆट्स शिल्लक असतात, पण बिल्डरला कदाचित बाजारभाव पसंत नसेल तर तो भाव वाढण्याची वाट बघत असतो. मला असे अनेक बिल्डर आणि प्रोजेक्ट्स माहिती आहेत जे सुरुवातीला सांगायचे की सगळे फ्लॆट्स संपले, कोणत्या तरी कच्च्या कागदावर लिहिलेली एखादी लिस्ट आणुन दाखवायचे की बघा, ही त्या लोकांची नावं ज्यांनी इथे फ्लॆट घेतला. सुरुवातीला मला ख्ररं वाटायचं ते. पण काही दिवसांनंतर होणार्या एखाद्या प्रदर्शना मधे तो प्रोजेक्ट्स दिसायचाच. मग मी एकदा जाऊन विचारलं, "तुमचे म्हणे सगळे फ्लॆट्स संपले होते. आता कुठुन आले?" काय बोलणार तिथला सेल्समन. समजुन घ्यायचं आणि जाऊ दे म्हणायचं. काही दिवसांनी मजा बघायला मिळते. त्या प्रोजेक्टच्या जाहिराती पुण्यात सगळीकडे झळकु लागतात पण तरीही लोक काही येत नाहीत बघायला. हे म्हणजे २३-२४ वर्षांच्या मुली सारखं असतं. तेव्हा सगळ्याच मुलींना खुप शिकलेला, चांगल्या स्वभावाचा, पैसेवाला, दिसायला देखणा आणि अमेरिकेमधे सेटल झालेल्या मुलाशी लग्न करायचं असतं आणि गम्मत म्हणजे, फक्त मुलगीच नाही तर तिचे मित्र मैत्रिणी, आई वडील, नातेवाईक सगळ्यांना खात्री असते की असा मुलगा मिळणारच. अवास्तव अपेक्षेपोटी चांगल्या मुलांना नकार देणं सुरु होतं. शेवटी काय, वय वाढत जातं. कधी अठ्ठाविसावं लागतं कळत पण नाही आणि मग अपेक्षा आणि मुलगी दोन्हीही जमिनीवर येतात. नंतर आलेल्या कोणत्याही स्थळाला होकार देऊन लग्न करुन टाकतात. बिल्डर ची पण अशीच गत होते. सुरुवातीला माज असला की लोक घर घेत नाहीत. मग प्रोजेक्टचा पैसा निघत नाहीये म्हणुन कर जाहिराती. पेपर मधे पहिलं पान भरुन टाक. रेडिओ वर दिवस रात्र ठणाणा कर. नंतर काहीही होत नाही. शेवटी येईल त्या भावाला फ्लॆट विकुन गुंतवलेला पैसा कसा काढायचा इथपर्यंत अवस्था होते. म्हणुन अजिबात आशा सोडायची नाही. घर मिळतं म्हणजे मिळतंच. फक्त थोडे "पेशन्स" बाळगावे लागतात. अजुन एक टिप, बिल्डर सोबत घासाघीस कशी करावी? घर बघायला जाताना अत्यंत आत्मविश्वासाने जा. जर तुम्ही घर घेणार नसाल किंवा बजेट नसेल तर लगेचच आपली "बॊडी लॆंग्वेज" बदलते. आपण थोडेसे आत्मविश्वास हरवल्यासारखे करतो. नर्वस होतो. प्रत्येक गोष्टीमधे हे आपल्याला परवडणार नाहीये, जाऊ दे असे वागायला लागतो. आणि नेमकं हे समोरच्याला दिसतं. अहो आपल्यासारखे शेकडो लोक रोज येत असतात. तुमच्या नुसत्या चालण्यावरुन कोणीही सांगु शकेल की तुम्ही फ्लॆट घेणार का नाही. आणि बर्याच वेळा होतं काय की आपल्या बजेट पेक्षा तो फ्लॆट एखादा लाख जास्त असतो. मग त्याला थोडसं खाली आणायचं आहे ना, तर असे रुबाबात वावरा की झालं, तुम्ही फ्लॆट घेऊन मोकळे झाला आहात. ऎटिट्युड मधे सांगायचं की "फ्लॆट ठीक आहे. रेट ठीक असेल तर करु विचार. चेकबुक सोबत आणलं आहे. हवं तर पहिला चेक देऊन बुक करतो. २ लाख पुरेत ना!" त्या बिल्डरला हा विश्वास वाटला पाहिजे की आपली ऐपत आहे आणि आपण त्याचा वेळ वाया घालवत नाहीये तरच तो घासाघीस करेल आणि खरंच कोणत्या मजल्यावर किती फ्लॆट्स शिल्लक आहेत हे खरं बोलेल.

आता सर्वात शेवटचा पण सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा, पैसा. कुठुन आणणार? तुमची तयारी किती हवी? बॆंक कर्ज देते का? किती? हे सगळं. २७-२८ लाखांचा फ्लॆट घेत असाल तर किमान ५ लाख तरी रोख हवेत. आणि पगार एवढा तरी असावा की २२-२३ लाख कर्ज मिळेल. साधारण पणे २० लाख कर्ज आणि बाकीचे रोख पैसे हे सगळ्यात उत्तम. कारण असं की २० लाखापर्य़ंत कर्ज थोडसं स्वस्त असतं आणि त्याच्या नंतर व्याज दरामधे अर्धा टक्का वाढतो. कॊणतीही बॆंक घराच्या किमतीच्या जास्तीत जास्त ८५% कर्ज देते. या मधे घराची नोंदणी, स्टॆंप ड्युटी हे सुद्धा अंतर्भुत असतं. कोणत्या बॆंकेचं कर्ज घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. बिल्डर म्हणतात की खाजगी बॆंकेचं कर्ज घ्या. त्यांची नाव इथे देत नाहीये पण तुम्हाला ते कळेलच. भारता मधल्या अग्रगण्य बॆंका आहेत त्या. त्यांच्या कडे कर्ज पटकन मिळतं. कागदपत्र कमी लागतात पण व्याजदर अधिक असतो. सरकारी बॆंकेच्या व्याजदरांसोबत तुलना केली असता २० लाखांच्या १५ वर्षांसाठीच्या कर्जावर तुम्ही किमान ३-४ लाख जास्तीचे द्याल. सरकारी बॆंकेमधे व्याजदर कमी असतो पण बरेच खेटे मारावे लागतात. कर्ज मिळायला वेळ लागतो आणि तोपर्यंत बिल्डर थांबायला तयार होत नाही. म्हणुन म्हणालो, हा निर्णय़ तुम्हालाच घ्यावा लागेल.

खरं म्हणजे हल्ली घरं एवढी महाग झाली आहेत की एकट्याला घर घेणं परवडत नाही. तुमचं लग्न झालं आहे का? बायको कमावती आहे का? आणि त्यातल्या त्यात जर प्रेमविवाह असेल तर विचारायलाच नको. मुलांनो, तुम्ही प्रेमात पडल्यामुळे मुलीच्या बापाचा हुंड्याचा पैसा वाचला आहे आणि तुम्ही सगळ्यांशी भांडुन, लढुन ही लग्नाची लढाई जिंकला आहात तर मग तुमच्या साथीदारावर थोडासा कर्जाचा भार हलका करा. आणि तुमचं जर ठरवुन लग्न झालेलं असेल पण तुम्ही त्या नशिबवान लोकांपैकी एक असाल ज्यांना सासर्याने भरभरुन दिलं आहे (कोण आहे या प्रेमाला हुंडा म्हणणारं? काय लोकं असतात ना. सासरचे लोक जावयाला प्रेमाने देतात तर हे अशी नावं ठेवतात !!!) पण जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला कर्जामधे कुठुनही कसलीही मदत मिळायची अपेक्षा नाहीये तर मित्रांनो, माझी पुर्ण सहानुभुती तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला "ऒल द बेस्ट". गमतीचा भाग सोडला तरीही खरंच थोडंस अवघड असतं पण माझं ऐका आणि टिपिकल मराठी माणसासारखे वागु नका. थोडंस धाडस करा. कर्ज घेणं म्हणजे काही खुप मोठी रिस्क नाहीये. आणि एवढीशी पण रिस्क नको असेल आणि तरीही घर घ्यायचं असेल तर नेपाळ मधे स्वस्त घरांची नवी स्कीम आली आहे. तिथे घ्या. कारण तिथेच परवडेल.

मदतीचा हात, प्रशंसा, प्रसंगी टीका, लोकांची बोलणी हे सगळं मी ब्लॊग मधुन अनुभवतो आहे. ते फक्त एकाच कारणासाठी. आपल्याला हळु हळु महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. सगळ्यात प्रगत राज्य. अपेक्षा आहे की यानंतर मी जेव्हा काही वर्षांनी घरा विषय़ी काही लिहीन तेव्हा विषय "मराठी माणसाने बंगला बांधताना घ्यायची काळजी" असा असेल.

आणि जाता जाता, बॊम्बे स्टॊक एक्सेंजची वेबसाईट मराठी मधे सुरु झाली आहे. आता सगळं सोपं आहे. तर मराठी बांधवांनो, बोला, पहिला शेअर कधी घेताय? काही लागलं तर मी आणि माझा ब्लॊग आहेच मदतीला.

कळावे.

सौरभ पंची
२२-डिसेंबर-२००९

5 comments:

ams December 22, 2009 at 9:58 PM  

nice article Saurabh..

if u permit..i'll forward this to Sakal Daily..

really good one.

सौरभ पंची December 22, 2009 at 10:14 PM  

Hi,thanks for appreciation. Well, I really don't think that it's that good to forward to a news paper. Moreover as it is just a blog, it gives me some freedom to express myself completely. To write something in a news paper, we have to consider social aspects of the article as well. So I really want to keep it just as a blog. But really thanks for the encouragement.

shilpa December 22, 2009 at 10:57 PM  

Hi Saurabh....
I must say that you are a great writer and no doubt have strong command on marathi language..Seriously hats off to you...As you wrote in your previous blog that most of the maharshtrian peoples use to read chetan bhagat novels while they have not even read Mrityunjay then its true with me.I've never read "Mrityunjay" as my marathi is not so good and Chetan Bhagat is one of my favorite author but after reading this blog some how even you have become one of the person whose contents i can definately read with interest...
Keep it up and do continue writing such interesting blogs....All the best
Shilpa

shivaji kolhe December 30, 2009 at 11:14 PM  

Hi Saurabh,

it's and nice blog. Shabda rachana aani mahiti sarv kahi uttam aah:)
Thanks & regards,
Shivaji kolhe

Kapil Deo December 30, 2009 at 11:58 PM  

Ati sundar !! Mitra eka pragalbh lekhaka sarakh lihilas ! Bhawi likhana sathi khup khup shubhecha !